स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यावरुन सिलेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. एकिकडे याची एवढी गरज जाणवत असताना दुसरीकडे व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाच्या नावाखाली लोकांची आर्थिक पिळवणूक सुरु आहे. पैसा घेऊनही व्यक्तिमत्त्वात बदल झाल्याचे दिसून येत नाहीये. अशा वेळी काय करावे, आणि काय करु नये अशा मानसिक तणावातून आजचा तरुण वर्ग जात आहे.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, व्यक्तिमत्त्व विकासाचे 12 मुद्दे / टिपा. यामुळे निश्चितच तुमच्यात बदल घडून येतील. यांचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
स्वतःला जाणून घ्या
स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा.
तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा
तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत.
तुम्हाला स्वताचे मत असू द्या
कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहित धरु लागतात. यात तुमचे नुकसान होते.
नवीन लोकांना भेटा
असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ग्रुप वाढतो. तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते.
वाचन करा, नवीन छंड जोपासा
वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कर्मी लागतो.
तुम्ही चांगला श्रोता व्हा
समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.
तुम्ही जरा विनोदी राहा
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव शिरला आहे. शिवाय चार डोकी भेटली, की कायम गंभीर विषयांवर चर्चा केली जाते. अशा वेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिमाण देऊन जातो. पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजेशा, समंजस आहे हे आधी तपासून घ्या. नाहीतर हसे करुन घ्याल.
इतरांचा आदर राखा
भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला, सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी मिळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो.
बॉडी लॅंग्वेजवर भर द्या
समोरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बोलताना अगदी कंम्फरटेबल राहा. तुमच्या बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बॉडी लॅंग्वेजला खुप महत्त्व आहे.
ड्रेसिंग सेन्स सुधारा
एखाद्या इव्हेंटनुसार आपले ड्रेसिंग ठेवा. ऑफिसला जाताना साजेशे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा मॉर्डन दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्जसोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स घाला.
आत्मपरिक्षण करा
आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.
कॉन्फिडन्ट राहा
आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वतःला दुर्लक्षितही करु नका. अन्यथा तुमच्या गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता. तेव्हा बी कॉन्फिडन्ट. जगावर मात करा...
स्त्रोत : दिव्य मराठी
माहिती संकलन : छाया निक्रड
_____________________
Best Selling E-Books
जर तुम्हाला यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर
शिका विकायला - कोणतीही गोष्ट!
________________________
Comments
Post a Comment